Monday, May 11, 2015

कोकण सफर : १ : तयारी आणि सुरुवात

माझ्या मित्रांसोबतची माझी सर्वात मोठी आणि अविस्मरणीय ट्रीप म्हणजे आमची कोकणातली सफ़र. ट्रीप सर्वात मोठी असली तरी ग्रुप सर्वात छोटा. मी, मयुर आणि अक्षय आम्ही तिघेच.

कॉलेज मध्ये असताना आम्ही गेलेल्या या ट्रीपची आठवण काही वर्षे होऊन गेली तरी ताजी आहे. म्हणुन याबद्दल लिहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. शेवटी आता लिहायला घेतलंय.

मी आणि माझ्या जवळपास सर्वच मित्रांना फिरण्याची खूप आवड आहे. असाच माझा एक शाळेपासूनचा मित्र चेतन. आम्ही १२वि मध्ये असताना एसटीचा काही दिवसांचा पास काढून स्वस्तात मस्त फिरायचा आम्ही विचार केला होता.

पण दुर्दैव असं कि त्याने आणि मी सोबत बनवलेल्या प्लानमध्ये बऱ्याचदा त्याला स्वतःला कधी येता आलं नाही. बारावीनंतर तो पुण्याच्या कॉलेजला गेला आणि मी आमच्याच शहरात म्हणजे औरंगाबादला. मग आमच्या परीक्षा आणि सुट्या नेहमी पुढे मागे व्हायच्या आणि त्याची काहीतरी गडबड व्हायची. आम्ही कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीला लागल्यावर कुठे त्याला आमच्यासोबत फिरता यायला लागलं आणि त्याचं एक छोटंसं दुःख संपलं. थोडक्यात या ट्रीपमध्ये यायची इच्छा असून त्याला येता आलं नाही.

मयुरसुद्धा माझा शाळेचा मित्र. ११वि आणि १२ वि वेगळी झाल्यावर एमआयटीमध्ये आम्ही इन्जीनियरिंगला पुन्हा सोबत आलो. आणि अक्षय माझा फर्स्ट ईअरमधेच झालेला मित्र. काही दिवसातच आमचं मस्त जमलं. आमची बस-पासवाली कल्पना मी या दोघांसमोर मांडली. दोघांनाही हि ती आवडली आणि आमची योजना बनायला सुरुवात झाली. 



सर्वात आधी आम्ही आमच्या घरच्यांची परवानगी घेतली. आम्ही तिघे तेव्हा १६-१७ वर्षांचेच असू. त्यामुळे इतके दिवस बाहेर फिरण्याआधी संमती मिळवणं आवश्यकच होतं. आमच्या सर्वांच्याच आई-बाबांनासुद्धा अशी आवड असल्यामुळे आम्हाला अगदी सहज परवानगी मिळाली.

अशी परवानगी असली तरी आम्हाला काही अगदी उधळपट्टी करत फिरायचं नव्हतं. आपल्या फिरण्याचा खर्च मर्यादेबाहेर जाता कामा नये हे आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे हि कल्पनाच मुळी एसटीचा पास काढून अगदी कमी खर्चात फिरायचं इथून सुरु झाली होती.

आम्ही एसटीचा १० दिवसांचा पास काढून फिरायचं ठरवलं. आणि १० दिवस फिरण्याजोगी, प्रेक्षणीय स्थळे अगदी जवळजवळ असणारी महाराष्ट्रातली जागा म्हणजे कोकण. कोकणात अशी ठिकाणे अगदी कमी अंतरावर आहेत. बाकी भागातसुद्धा प्रेक्षणीय स्थळे असली तरी अंतरे बरीच जास्त असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातच बराच वेळ गेला असता. त्यामुळे कोकणात जायचं आम्ही पक्कं केलं.

कम्प्युटर आणि इंटरनेटमुळे काळ खरोखर इतक्या झपाट्याने बदललाय, कि अगदी काही वर्षापूर्वी "त्या काळी" अशा भाषेत मला सांगावं लागतंय. तर "त्या काळी" गुगल मॅप्स इतके प्रचलित नव्हते. घरी असलेल्या इंटरनेटचा वेगसुद्धा विशेष नव्हता.

आमच्या सहलीची आखणी आम्ही सिग्नलवर मिळतात तश्या एका महाराष्ट्रावरच्या पुस्तकातून केली. त्यात प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती, तिथली ठिकाणे, मंदिरे, जिल्ह्याचा नकाशा, आणि शेवटी महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा होता. ह्यातूनच आम्ही ठिकाणे निवडली आणि हे पुस्तक सोबत घेऊनच प्रवास केला.

काही दिवशी आम्ही एकाच दिवशी दोन तीन छोट्या गावात फिरणार होतो. मग अशावेळेस सामान घेऊनच फिरायचं तर पाठीवर घेऊन जाता येणारी आणि तरी १० दिवसाचे सामान मावेल अशी मोठी बॅग हवी होती. टीव्हीवर (डिस्कव्हरी) ट्रेकिंगला जाणारे किंवा मोठ्या प्रवासाला जाणारे लोक जशी बॅग घेऊन फिरताना दाखवतात तशी बॅग मी खास या सफरीसाठी घेतली. तिचा मला खूप छान उपयोग झाला. बरंच काही कोंबता येतं या बॅगमध्ये. ती अजूनही माझ्याकडे आहे.

उत्तर कोकण काही अंशी आम्ही घरच्यांसोबत किंवा शाळेच्या सहलीत पाहिलेला होता. म्हणून आम्ही दक्षिण कोकणावर जास्त भर दिला.

पासमुळे प्रवास खर्च तर कमी झालेलाच होता. आम्ही बाकी खर्चसुद्धा कमीत कमी करायचा ठरवला होता. जमेल तिथे रात्री प्रवास ठरवला, म्हणजे त्या रात्री राहायचा खर्च नाही. काही ठिकाणी सकाळी एसटी स्थानकावरच प्रातःविधी उरकले.

औरंगाबादपासून कोकण तसं बरंच लांब आहे. एकाच दमात खूप प्रवास न करता आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गातली ठिकाणे बघत जायचा विचार केला. त्यामुळे दक्षिण कोकणात आम्ही कोल्हापूरमार्गे जायचं ठरवलं. तळकोकणात जाऊन मग एक एक ठिकाण बघत वर सरकायचा आमचा बेत होता.

औरंगाबादहून रात्री कोल्हापूरला जाणारी गाडी आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही पुण्याची गाडी पकडली. आमचे आईबाबा आम्हाला सोडायला आले होते. रात्री १० ची गाडी पकडली आणि आमचा पास पुढच्या तारखेला म्हणजे १२ वाजता सुरु होणार होता, म्हणून आम्हाला १०-१२ असं अंदाजे अर्ध्या अंतराचं तिकीट काढावं लागलं.

आमच्या या अविस्मरणीय सहलीचा प्रवास अशाप्रकारे सुरु झाला.

No comments:

Post a Comment