Wednesday, July 23, 2014

जकार्ताच्या आठवणी : २ : प्रथम दर्शनी

मी मलेशियन एअरलाईन्सच्या विमानामध्ये मुंबईहून जकार्ताला निघालो. या विमान कंपनीच्या एमएच 370 विमानाच्या आताच्या घटनेमुळे बरेच लोक या नावाला घाबरतात. अनेकजणांनी मला इशारा दिला. मीसुद्धा सतर्क होतोच. पण शेवटी अशा घटना घडत राहतात, म्हणून आपण काही त्या गोष्टी करणे थांबवू शकत नाही. मुंबईमध्ये सीएसटीवर हल्ला झाला होता, पण लोक तेथे जाणे थांबवू शकत नाहीत, पुण्यातसुद्धा जेएम/एफसी रोडवर हल्ला झाला होता, आणि अजूनही ती वर्दळीची आणि लोकप्रिय खरेदीची ठिकाणे आहेत. एमएच 370 तर अजूनही एक गूढ आहे. सुदैवाने, माझा पुढचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होता.

माझे पहिले विमान मध्यरात्री मुंबई ते क्वालालंपूर असे होते. मी थोडा वेळ झोपलो. रात्रीचं खिडकीबाहेर पाहण्यासारखं काही नव्हतं. थोडा वेळ लॉर्ड ऑफ दि रिंग्स हा सिनेमा पाहिला. सुदैवाने मी सूर्य उगवतेवेळी जागा होतो, आणि तो विलक्षण होता. अशा उंचीवरून सूर्योदय पाहणे हा एक आयुष्यभरासाठीचा संस्मरणीय अनुभव आहे.

दुसरे विमान पहाटे क्वालालंपूरपासून जकार्तापर्यंत होते. हा थोडा जवळचा प्रवास होता. मी माझ्या खिडकीतून निसर्गरम्य देखावे बघत संपूर्ण जागा होतो. एकदा विमान समुद्रावर होते, आणि तिरपे झुकलेले होते, आणि खाली फक्त पाणी दिसत होते. क्षितीजरेषा जवळपास अदृश्य झाली होती. निळे आकाश आणि समुद्र एकमेकांमध्ये विलीन झालंय असं वाटत होतं. फक्त एक बोट, किंवा एक मोठं जहाज देखील असू शकेल बरीच दूर चालेली दिसत होती. मी हा सुंदर देखावा कधीच विसरणार नाही.

मी जकार्ता मध्ये उतरलो आणि इमिग्रेशन आणि सीमाशुल्क तपासणीसाठी गेलो. इमिग्रेशनवाल्या माणसाने इतर प्रवाश्यांपेक्षापेक्षा माझ्याबाबतीत प्रक्रिया करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतला.  बहुतेक प्रत्येक प्रवासी असाच विचार करत असेल. मी डॉलर्स इंडोनेशियन रुपियाहमध्ये बदलून घेतले आणि बाहेर आलो. मी हॉटेलला जाण्यासाठी एक टॅक्सी केली. टॅक्सीचालक अतिशय आनंदी आणि बडबड्या स्वभावाचा व्यक्ती होता. मला असाच अनुभव सगळीकडे आला. सर्वसाधारणपणे इंडोनेशियन्स आनंदी हसतमुख आणि सहज मैत्री करणारे लोक आहेत.

भरपूर शतकांपूर्वी इंडोनेशियामध्ये मुख्यतः हिंदू लोक होते, असे मी इतिहासात कुठेतरी वाचले होते. कालांतराने येथील बऱ्याचशा लोकांनी इस्लाममध्ये धर्मांतर केले. पण बाली बेटासारख्या ठिकाणी अजूनही काही हिंदू आहेत. संस्कृत, हिंदू संस्कृतीचा प्रभाव अजूनही त्यांची भाषा, आणि हावभाव यात दिसून येतो. भारतीय लोकांसारखे इंडोनेशियन्स देखील त्यांचे हात जोडून नमस्कार करतात. मुलासाठी पुत्र आणि मुलीसाठी पुत्री असे शब्द अगदी संस्कृत सारखे आहेत.

चालकाचं नाव होतं गुणवान. शुद्ध संस्कृत नाव. त्याने लगेच ओळखलं कि मी भारतातून आलेलो आहे आणि बडबड सुरु केली. आपलं भारताविषयीचं ज्ञान दाखवायला लागला. अर्थात हे ज्ञान फक्त बॉलीवूड आणि टीव्ही सिरिअल्सपुरतं मर्यादित होतं. :D त्यांच्या लहेजामध्ये तो महाभारताला माबारत, भीमाला बिमा, युधिष्ठीरला उदिष्टीर अशी नावं घ्यायला लागला. काही मोजकीच भारतीय टीव्ही चॅनेल इथे दाखवतात, आणि त्यातल्या एकावर महाभारत (नवीन) चालू असतं. ते इथे बरंच लोकप्रिय आहे. इंडोनेशियाच्या पारंपारिक रंगभूमीवर फार आधीपासून रामायण महाभारताचे प्रयोग होत असल्यामुळे त्यांना हे देखील आवडतं. मग त्याने बॉलीवुडविषयी बोलण्यास सुरु केलं. शारूक कान (शाहरुख खान) इथे अति लोकप्रिय आहे. त्याचा कुची कुची ओता ऐ (कुछ कुछ होता है) इथे बहुतेक सर्वांनी पाहिला असेल. 

पुढे जेव्हा मी इंडोनेशियाच्या रस्त्यांवरून बाजारातून फिरायला लागलो तेव्हा मला कमीत कमी दोन-चारदा शाहरुखची गाणी ऐकायला मिळाली. पायरेटेड डीव्हीडीच्या दुकानामध्ये महाभारत सिरिअलची, शाहरुख आणि काही भारतीय सिनेमांची डीव्हीडी देखील बघायला मिळायची. 

जकार्ताचं विमानतळ शहराच्या थोडं बाहेर आहे. आम्ही विमानतळाचा परिसर सोडताच आम्हाला खूप ट्राफिक लागलं. गुणवान मला सांगत होता कि जवळपास नेहमीच असंच ट्राफिक असतं. त्याने मला परत निघायचं असेल तेव्हा खबरदारी म्हणून हॉटेल मधून २ तास आधीच निघायला सांगितलं. माझं हॉटेल सोमरसेट विमानतळापासून ३५-४० कि.मी. दूर होतं. आणि आम्हाला पोचायला दोन तास लागले. 

त्याच्याशी बोलता बोलता मी बाहेर रस्ते, पूल, गाड्या, इमारती वगैरे बघत होतो. फोटो काढत होतो. जकार्तामधल्या पायाभूत सुविधा खूपच छान वाटल्या. मोठमोठे पूल, चार पदरी रस्ते, भव्य इमारती, तिथल्या उच्च तंत्रज्ञानाची ग्वाही देत होते. पण हे सगळं असूनसुद्धा आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो होतो. 

गुणवानकडून, किंवा माझ्या जकार्ताबद्दलच्या वाचनातून, आणखी लोकांकडून मला जे समजलं ते असं कि, जकार्ता हीच इंडोनेशियाची मुंबई आणि दिल्ली दोन्ही म्हणजेच राजकीय, औद्योगिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथेच भरपूर लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. आणि त्यात मुंबईप्रमाणेच नित्य नवीन लोकांची भर पडत राहते. त्यामुळेच इतक्या सुविधा निर्माण करूनसुद्धा वाढत्या लोकसंख्येला अपुऱ्या पडत आहेत. या सततच्या ट्राफिकचे हेच कारण आहे. 

रस्त्यावरून जाताना मला बरेच मॉल दिसले, मोठ्या ब्रँडची दुकाने, फूड चेन्स, रिटेल चेन्स दिसल्या. आणि जेव्हा चालकाने टॅक्सी शॉर्टकटसाठी लहान गल्ल्यांमधून नेली तेव्हा आपल्यासारख्याच चहाच्या टपऱ्या, छोटे खाद्यपदार्थांचे गाडे दिसले. आणि बरेच लोक चहा-सुट्टाचा ब्रेक घ्यायला आलेले होते. 

हॉटेलला जाईपर्यंत रस्त्यावर मी काढलेले काही फोटोज पाहण्याकरता इथे क्लिक करा

मी दुपारच्या जेवण्याच्या वेळी हॉटेलला पोहोचलो, आणि माझ्या रूममध्ये चेक इन केलं. रूम काय, तो खरं तर एक १ BHK फ्लॅटच होता. एक सुसज्ज स्वयंपाक घर होतं. माझ्यासारखे भारतीय आपल्या भारतीय अन्नापासून फार काळ लांब राहू शकत नाहीत. आणि बाहेर जर भारतीय अन्न हवं असेल तर स्वतःलाच बनवून घ्यावं लागतं. त्यामुळे अशा सोयींची मला गरजच होती. माझी रूम पाहून माझ्या जीवात जीव आला. आता प्रवास संपला होता. माझं ऑफिस माझी वाट पाहत होतं.

No comments:

Post a Comment