Sunday, January 1, 2012

पॉकेटमनी

पॉकेटमनी हि गोष्ट आपल्यातल्या बऱ्याचजणांसाठी अगदी सामान्य गोष्ट असेल, तर बर्याचजणांसाठी ती अस्तित्वातही नसेल. आपल्या मुलांना त्यांच्या छोट्या-मोठ्या खर्चांसाठी पालक आठवड्याला किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम देतात, आणि ती मुलांनी व्यवस्थित खर्च करून वापरायची अशी हि कल्पना. मुलांना आपले खर्च नीट विचार करून करणं, त्यातून बचत करणं अशा गोष्टी शिकायला मिळतात, असं म्हणतात.

मला असा पॉकेटमनी कधीच नव्हता. लागेल तसे पैसे आईकडून मागून घेणे, अशीच अगदी नोकरीला लागेपर्यंत आमची पद्धत होती. मलाच काय माझ्या मित्रांपैकी कोणालाच असं खर्चायला पैसा नियमितपणे मिळत नव्हता. काही जणांच्या नावे बचत खाती, आणखी काही प्रकारे पैसे ठेवत असतील, पण खर्चायला पैसे तसे कमीच मिळायचे. आणि तशी फार गरजही नव्हती.

आम्हाला शाळेत जायला यायला रिक्षा लावलेली होती, आणि शाळेत पण डबा दिलेला असायचा, त्यामुळे पैशांची गरज अशी काहीच नव्हती. लहानपणी तर, शाळेतले फॉर्म वगैरे विकत घ्यायचे असायचे, त्याचे २-३ रुपये सुद्धा आम्ही खास मागून घेऊन जायचो. कारण त्याखेरीज आमच्याकडे काहीच नसायचं.

कधी बाहेर खाण्याची हुक्की आली, तरी एक दिवस आधी ठरवून, दुसऱ्या दिवशी पैसे न्यायचो. खाण्यापिण्याचे आमच्यासमोर जे पर्याय होते ते पण अगदी साधे आणि स्वस्त. पूर्णानंद आमच्या शाळेसमोरचे प्रसिद्ध दुकान, तिथे दाबेली, वडापाव, मसाला पाव वगैरे.. माझ्या आठवणीतली पहिली दाबेली मी तिथेच खाल्ली. अजून बाबुभाई नावाचा आमचा आवडता चाटवाला होता. कांता नावाचा चॉकलेट मुरकुलछाप गोष्टी विकणारा गाडीवाला. बोरकूट, पेरू, लबदु विकणाऱ्या बायका.

या सगळ्यांकडे जे काही मिळायचं त्याची सरासरी किंमत अडीच रुपये. त्यामुळे आम्हाला जेव्हा बाहेर खायचं असायचं तेव्हा १० रुपये मिळायचे. आणि त्यात आम्ही मस्त ऐशपण करायचो. मी आणि सुशांत (माझा चुलत भाऊ) आम्ही दोघं नेहमी सोबत असे पैसे खर्च करायचो. दहा रुपयात त्याला आणि मला एकेक दाबेली/वडापाव, आणखी एखादी डिश, माझा आवडता पेरू, आणि 'घटाघट' नावाच्या खारवलेल्या आंबट-गोड गोळ्या (एका रुपयात चार-सहा :-) ) अशी फुल चंगळ असायची. आता दहा रुपये एकालासुद्धा पुरणार नाहीत.

आठवीनंतर आम्ही बस, सीटर वगैरेनी शाळेत जाणे येणे करायला लागलो, तेव्हा खरे रोजच्या रोज खिशात पैसे खेळायला लागले. मग आधी महिन्यातून एक-दोनदा होणाऱ्या या गोष्टी रोज व्हायला लागल्या, आणि त्यांची अतिपरिचयाद अवज्ञा झाली.

त्याच सुमारास, बस स्टोप जवळ शैलेश नावाच्या युपीच्या भैयाने दाबेलीची गाडी सुरु केली. त्याच्याशी आमची छान गट्टी जमली होती. पुढे माझा बारावीचा क्लाससुद्धा त्याच भागात असल्यामुळे सलग ४-५ वर्ष आम्ही त्याच्याकडे जात होतो. पाहता पाहता तो मोठा माणूस झाला, आज त्याच्या औरंगाबादमध्ये ५-६ दाबेली, पावभाजीच्या गाड्या आहेत. तो स्वतः आता फार कमी वेळा गाडीवर असतो. पूर्णानंदचे कर्वे काका, कांता, शैलेश या सगळ्यांशी कसे बंध जुळले सांगता येत नाही, इतकी मुलं दर वर्षी येतात जातात म्हणून नावाने नाही, पण चेहऱ्याने हि मंडळी आजही ओळख ठेवून आहेत. शैलेश स्वतः गाडीवर असला तर थोडा वेळ गप्पा मारतो, खुशाली विचारतो, आग्रह करतो. त्यांच्याशी बोलताना पुन्हा जुन्या दिवसात गेल्यासारखं वाटत.

जसजसे मोठे होत गेलो तसे उद्योग वाढले, गाडीवर खाण्यासोबत हॉटेलमध्ये जाणेपण व्हायला लागलं, पिक्चर पहायचा, तो पण बहुतकरून पहिल्याच दिवशी, असं व्यसन लागलं. आमच्या गरजा वाढल्या. १२वि मध्ये तर हिशोबात गफले करून मी भरपूर पिक्चर पाहिले, त्याची कबुली मी काही महिन्यांनी द्यायचो. :-D पाहिजे ते करत असलो तरी आमच्या मर्यादा आम्हाला ठाऊक होत्या. एखाद्या महिन्यात जरा कमी खर्च करा असे वरून आदेश आले कि आम्ही निमूट पाळायचो. हौसमौज मनसोक्त केली, पण कधी बेछूट नाही.

आता स्वतः कमावतोय तर ह्या गोष्टी बंद झाल्या. पण अजून तेच हवंसं वाटतं. पैशाला किती फाटे फुटतात, आणि त्यात विचार करून खर्च आणि बचत सांभाळणे किती मुश्कील आहे, हे पाहतोच आहे. हे सगळं आईबाबा करत होते तेच बरं. सगळा पगार आणि हिशोब त्यांच्याकडेच सोपवून परत पॉकेटमनी सुरु करावा वाटतोय. :-)

No comments:

Post a Comment