Monday, December 19, 2011

प्रास्ताविक : लहानपण देगा देवा...


सध्या फेसबुक आणि मेल्समधून ८० च्या दशकात जन्मलेल्या (माझ्या) पिढीची वैशिष्ट्ये, या विषयावर अनेक पोस्ट आणि फॉरवर्डस फिरत आहेत. त्याच्यात आपल्या पिढीच्या काळात असलेल्या गोष्टी, तंत्रज्ञान, मालिका, महत्वाच्या घटना यावर विनोदी अंगाने भाष्य केले आहे.. उदा. एका पोस्ट मध्ये लिहिलं आहे , आपण रस्त्यावर खेळलेली शेवटची पिढी आहोत, (the last generation to have played on streets) 

आपल्या पिढीने टीवी, फोन, इंटरनेट यासारख्या अनेक गोष्टींचा उदय, आणि विस्तार पाहिला. त्यांनी आपलं आयुष्य बदलताना पाहिलं.  अगदी काही वर्षापूर्वी प्रचलित असलेल्या गोष्टींना कालबाह्य होताना पाहिलं. प्रत्येक पिढीकडे असल्या आठवणी, आणि सांगण्यासारख्या गोष्टी असतातच. आपली पिढी त्याला अपवाद नाही. अशा अनेक गोष्टी आपण आयुष्यभर पाहत राहू.

पण लहानपणी असल्या गोष्टींमध्ये असलेल्या नावीन्याचा आनंद, भाबडेपण, निरागसता नंतर राहत नाही. लहानपणी, कोणी अमेरिकेबद्दल रंगवून सांगितलेल्या गोष्टी, आपण जितक्या उत्सुकतेने ऐकू, आणि हरखून जाऊ, तितकं आता नक्कीच होणार नाही. कोणी तंत्रज्ञानाचे कितीहि चमत्कार सांगितले तरी आपल्याला त्याचं काही वाटणार नाही, 'असेल यार' यापलीकडे आपली प्रतिक्रिया दुर्मिळच.

त्यामुळे आता आपल्याला अगदी सध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला लहानपणी किती भारी वाटल्या होत्या, आपल्या लहानपणी आपण कसले कसले मूर्ख कुटाणे आणि पराक्रम केले होते... मोठे लोक जसे, 'आमच्या काळी....' असल्या सुरुवातीने भलत्या सलत्या गोष्टी सांगत राहतात, तशा आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, हा विचार करत बसलो तर, त्या सगळ्या आठवणींमुळे खूप मस्त वाटतं.


मी अशाच काही आठवणी या लेखमालेतून तुमच्याशी शेअर करणार आहे. स्मरणरंजन हाच या लेखमालेचा उद्देश आहे. मी लिहीन त्यातल्या काही गोष्टी कदाचित वैयक्तिक असतील, अजून कोणी अनुभवल्याही नसतील, पण बहुतांश गोष्टी तुम्हाला ओळखीच्या वाटतील.. त्याच घटना थोड्याफार फरकाने तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील. माझ्या आठवणी वाचताना तुम्हालाहि बऱ्याच गोष्टी आठवून जातील.  

प्रत्येकात एक लहान मुल जिवंत असतं म्हणतात.. ह्या आठवणी वाचताना तुमच्यामधील मुल जागं झालं, तर तुम्हालाहि '३ idiots' मधल्या 'give me some sunshine' या गाण्यात म्हटल्यासारखे परत लहान होऊन जगावं वाटेल.. असं वाटल्यास तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे देवाला साकडं घालाल..

लहानपण देगा देवा.....

3 comments:

  1. लवकर share कर तुझं बाळपण...
    एक बाळ आपल्या बाळपणी कसं होता, हे वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल !

    ReplyDelete